(रत्नागिरी/ प्रतिनिधी )
खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाचे तलाठी बजरंग दत्तात्रय चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (१ जानेवारी २०२६) चाफे येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१, सध्या रा. ओम शांती अपार्टमेंट, नाचणे, रत्नागिरी; मूळ रा. कोणेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने मौजे आगरनरळ (ता. व जि. रत्नागिरी) येथे १० गुंठे बिनशेती जागा खरेदी केली होती. या मिळकतीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी तक्रारदाराने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र हे काम करून देण्यासाठी तसेच नाव लागलेला सातबारा उतारा आणि फेरफाराची प्रत देण्यासाठी तलाठी चव्हाण याने १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या प्रकाराबाबत तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, तलाठी चव्हाण याने लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून चाफे येथील कार्यालयात कारवाई केली. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच तलाठी बजरंग चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे व उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात सपोफौ उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांचा समावेश होता. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

