(रत्नागिरी / वार्ताहर)
सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जयस्तंभ परिसरात उभारण्यात आलेल्या आकर्षक रोटरी क्लॉक टॉवरचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
११.५ फूट उंचीचा हा भव्य क्लॉक टॉवर जयस्तंभ चौकातील सौंदर्यात भर घालणारा ठरला असून, नागरिकांसाठी वेळेची सहज उपलब्धता आणि शहराच्या सौंदर्यातील उल्लेखनीय भर यामुळे तो लवकरच एक ओळख बनणार आहे.
लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी ना. उदय सामंत, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, विलास चाळके, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. रुपेश पेडणेकर, सचिव अॅड. मनिष नलावडे, कोषाध्यक्ष माधुरी कळंबटे, सीनियर रोटेरियन धरमसीभाई चौहान, केशवराव इंदुलकर, विनायक हातखंबकर, अशोक घाटे, निलेश मुळ्ये, प्रमोद कुलकर्णी, श्रीकांत भुर्के, रोहित वीरकर तसेच असंख्य रोटरी सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने पुन्हा एकदा शहराच्या सार्वजनिक उपयोगासाठी व सौंदर्यासाठी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. नागरिकांकडून या अभिनव उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.