(गणपतीपुळे / वैभव पवार)
ग्रामीण भागातील महिला विविध क्षेत्र पादांक्रात करीत आहेत, त्यामुळे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचतगट समूहातील महिलांचा उत्साह वाढवण्याची गरज असून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीच्या स्वरूपात प्रतिसाद मिळवून देण्यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिर परिसरातील देवबागेत आज (बुधवार दिनांक 24 डिसेंबर) रोजी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांचे शुभ हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
यावेळी त्यांनी सरस प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचत गटांची माहिती देताना सांगितले की, सरस प्रदर्शनात महिला बचत गटांकडून हस्तकला, कला कस्तुरीच्या वस्तू, नर्सरी, बुरुड काम, कोकणी उत्पादने व खास कोकणी रुचकर पदार्थांची खासियत पर्यटकांना मिळणार आहे तसेच गणपतीपुळे येथे नाताळ सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या हंगामात पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निश्चितपणे महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी आणि त्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी सरस प्रदर्शन फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी महिला बचत गटांचे समूह राज्यस्तरावर किंवा राष्ट्र स्तरावर संवाद, स्पर्धा यामध्ये नेहमीच अव्वल स्थान प्राप्त करीत असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच चिपळूण येथील हिरकणी बचत गटाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक चे बक्षीस आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन गटांना देखील बक्षिसे प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद करीत बचत गट महिलांची सर्वोत्तम प्रगती होत असल्याचे सांगितले.
या सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरीचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे जिल्हा विपणन व्यवस्थापक अमोल काटकर गटविकास अधिकारी चेतन शेळके, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच सरपंच निलेश कोल्हटकर, गणपतीपुळे ग्रामपंचायत सरपंच कल्पना पक्ये उपसरपंच संजय माने आणि सरस प्रदर्शनाच्या संबंधित असलेल्या व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .या प्रदर्शनात 75 स्टॉलची बांधणी करण्यात आली असून यामध्ये सहा स्टॉल उत्पादनाचे व पंधरा स्टॉल खाद्यपदार्थांचे असणार आहेत. या 75 स्टॉलमध्ये 107 स्वयंसहायता समूह चार महिला शेतकरी उत्पादक कंपन्या व एक उद्योग विकास केंद्र यातील महिला सहभागी झाल्या आहेत. हे प्रदर्शन नाताळ सुट्टीच्या हंगामात आयोजित करण्यात आल्याने पर्यटकांबरोबर शाळांच्या सहली देखील या ठिकाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्री होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांना विविध उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.या प्रदर्शनामध्ये स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरुड काम, घोंगडी लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू ,इमिटेशन, ज्वेलरी) विविध प्रकारचे घरगुती मसाले ( मच्छी मसाले मटन मसाले विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे कोकणी प्रोडक्ट आदी इत्यादी माफक दरात पर्यटकांना उपलब्ध होणार आहे .या प्रदर्शन कालावधीत स्वयंसहायता समूहातील सदस्यांचे मनोरंजन पर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत .यामध्ये लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामूहिक कार्यक्रम तसेच सहभागी स्टॉल प्रतिनिधींकरता फनी गेम्स घेण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाच्या सांगता समारंभात उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणाऱ्या समूहांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाचा पर्यटकांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन कोकणातील विविध उत्पादने व रुचकर असलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी केले आहे.

