( मुंबई )
गेल्या काही महिन्यांपासून आरटीई (Right to Education – RTE) प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणीसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जानेवारीपासून आरटीई पोर्टल पुन्हा सुरू होणार आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे नियोजन आधीच सुरू केले असून पुढील एक ते दीड महिन्यात प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी न्यायालयीन प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे शाळा नोंदणीपासून प्रवेश वितरणापर्यंत अनेक त्रुटी निर्माण झाल्या होत्या.
यंदा अशा त्रुटी टाळण्यासाठी आणि अधिकाधिक खासगी शाळांचा आरटीईमध्ये समावेश व्हावा यासाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत ९ हजारांहून अधिक शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, यंदाही सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील खासगी शाळांमध्ये पूर्व-प्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्या, तरी आरटीई अंतर्गत राखीव जागा भरू नयेत, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जोपर्यंत आरटीई प्रवेश अधिकृतपणे सुरू होत नाहीत, तोपर्यंत २५ टक्के राखीव जागा रिक्त ठेवण्याचा आदेश शाळांना देण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा शाळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

