(रत्नागिरी)
रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सीमा प्रवीण बाचल (४४, मूळ रा. शिरगाव, ता. कन्हाड, जि. सातारा) असे महिलेचे नाव आहे.
सीमा बाचल या मनोरुग्ण असल्याने या महिलेवर रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना ती पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते.
त्या ठिकाणी १ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. त्याबाबतची माहिती तेथील रुग्णालयाकडून रत्नागिरी पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात ११ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.