(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
शिवसेना संगमेश्वर तालुका आयोजित श्रावण महोत्सवांतर्गत पारंपारिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमेश्वर नावडीच्या “अमृता ग्रुप”ने तृतीय क्रमांक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले.
ही स्पर्धा रविवार, दि. २७ जुलै रोजी देवरुख येथील मराठा भवन हॉलमध्ये झाली. तालुक्यातील विविध भागांतून तब्बल २२ महिला गट सहभागी झाले होते. स्पर्धेत मंगळागौर, टिपरी, शेतकरी नृत्य, जाखडी, नमन, आदिवासी नृत्य, समई, परात नृत्य, वारी नृत्य यांसारख्या पारंपारिक लोकनृत्य प्रकारांची रंगतदार सादरीकरणे करण्यात आली.
नावडीच्या अमृता ग्रुपने या स्पर्धेत तब्बल ५४ प्रकार सादर केले — त्यामध्ये २१ वेगवेगळ्या फुगड्या आणि ३३ मंगळागौरीचे प्रकार यांचा समावेश होता. या सादरीकरणात अमृता कोकाटे, सुविधा शेट्ये, सविता हळदकर, जानवी चिंचकर, आर्या मयेकर, नम्रता शेट्ये, सानिका कदम, सुप्रिया कदम, नयना शेट्ये, अर्पिता शेरे, संगीता जंगम यांनी सहभाग नोंदवला.
नृत्य सादरीकरणासाठी मंगळागौर गायन कु. आर्या राहुल कोकाटे हिने केले. तर वाद्यसंगतात तबला गिरीराज लिंगायत, पेटी यश जट्यार व शिवम भोसले, घुंघूर ईश्वरी माईन यांनी अप्रतिम साथ दिली.
कडक स्पर्धेतही अमृता ग्रुपने मिळवलेले यश संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. घरची जबाबदारी, संसार आणि मुलांचे शिक्षण यामध्ये वेळ काढत संध्याकाळी प्रॅक्टिस करून या महिलांनी स्पर्धेत भाग घेतला. त्यांच्या या चिकाटी व जिद्दीचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.
पारंपारिक कोकणी लोकसंस्कृती जपताना महिला कलावंतांनी दाखवलेला हा उत्साह स्तुत्य आणि प्रेरणादायी होता.