चित्रपट, टीव्ही इंडस्ट्री आणि सोशल मीडियामध्ये नेहमीच सक्रिय असणारी जॅकलीन ही मूळची श्रीलंकेची आहे. परंतु आता ती मुंबईत स्थायिक झाली आहे. जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिट बॉडी आणि नैसर्गिक चमकदार त्वचेसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकांना वाटतं की, यामागे महागडे डाएट प्लॅन असतील. मात्र प्रत्यक्षात तिच्या फिटनेसचं रहस्य खूप साधं आहे. जॅकलिन पूर्णपणे शाकाहारी आहार घेते आणि योग्य वेळी योग्य अन्न खाण्यावर भर देते. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत जॅकलिनने तिच्या फिटनेस आणि त्वचेमागचं खरं कारण सांगितलं. मांसाहार सोडल्यानंतर तिच्या शरीरात आणि आरोग्यात झालेले बदल तिने शेअर केले.
जॅकलिन तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स लोकांना देत असते. तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ आणि फोटोही ती सोशल मिडीयावरून पोस्ट करताना दिसते. जॅकलिन स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज सकाळी योगा करते. आत्तापर्यंत तिने सोशल मीडियावर योगासने आणि स्ट्रेचिंगचे अनेक फोटो शेअर केले आहेत. व्यायामाव्यतिरिक्त जॅकलिनला खेळणे, घोडेस्वारी करणेही आवडते. प्रवासात, सुट्टीवर किंवा मित्रांसोबत, जॅकलीनला संधी मिळेल, तेव्हा कुठल्या ना कुठल्या खेळात हात आजमावताना दिसते. खेळ कोणताही असो, तो माणसाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवतो, असं ती मानते.
मुलाखतीदरम्यान जॅकलिनने सांगितलं की, तिला बराच काळ मुरुमांचा त्रास होता. त्याचबरोबर वजनामध्ये सतत चढ-उतार होत होते. शाकाहारी आहार स्वीकारल्यानंतर तिच्या त्वचेतील मुरुम कमी झाले. पोटफुगीचा त्रासही लक्षणीयरीत्या घटला आणि वजन स्थिर राहू लागलं.
तज्ज्ञांच्या मते, शाकाहारी किंवा वनस्पती-आधारित आहार घेतल्यावर शरीरात फायबरचं प्रमाण वाढतं. सुरुवातीला यामुळे गॅस, पोटफुगी किंवा वजनात बदल जाणवू शकतात. म्हणूनच हळूहळू बदल करण्याचा सल्ला दिला जातो. डाळी, बीन्स आणि भाज्या मर्यादित प्रमाणात खाणे, भरपूर पाणी पिणे आणि दहीसारखे प्रोबायोटिक पदार्थ आहारात ठेवणे उपयुक्त ठरते.
मांसाहार सोडण्याचे आरोग्यदायी फायदे
- हृदय निरोगी राहण्यास मदत
- वजन नियंत्रणात राहते
- शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात
- अतिरिक्त चरबी साचण्याचे प्रमाण कमी
- पचनसंस्था सुधारते
जॅकलिनच्या मते, संतुलित शाकाहारी आहार त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. या आहारात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर असतात. यामुळे पचन सुधारतं आणि हार्मोनल संतुलन राखलं जातं. मात्र मुरुम फक्त आहारामुळे होत नाहीत. ताणतणाव, झोपेची कमतरता, हार्मोन्स आणि त्वचेची योग्य काळजीही तितकीच महत्त्वाची असते.
शाकाहारी आहार सुरु असताना बहुतेक लोक घरचं, नैसर्गिक अन्न खातात. प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर आणि फास्ट फूड टाळले जातात. यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि त्वचा हळूहळू स्वच्छ व तजेलदार दिसू लागते.
शाकाहारी आहारात प्रथिनांची गरज कशी पूर्ण करावी?
जॅकलिन सांगते की ती भाज्या, बीन्स आणि टोफूच्या मदतीने प्रथिनांची गरज पूर्ण करते. तज्ज्ञही याला दुजोरा देतात. मसूर, चणे, राजमा, टोफू, पनीर, दूध, काजू आणि विविध बिया हे शाकाहारी प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. भातासोबत डाळी किंवा पोळीबरोबर चणे खाल्ल्यास शरीराला पुरेसे प्रथिने मिळू शकतात.

