गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक महत्त्वाचे पुराण मानले जाते. या पुराणात सुमारे १९ हजार श्लोक असून ते दोन भागांमध्ये विभागलेले आहे. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार, गरुड पुराणाचे पठण केल्याने मृत व्यक्तीला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो आणि कुटुंबीयांना मानसिक व आध्यात्मिक शांती मिळते.
गरुड पुराणामध्ये मृत्यू, आत्म्याचा प्रवास, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यांचे सविस्तर वर्णन आढळते. यामध्ये मृत्यू येण्यापूर्वी व्यक्तीला कोणते संकेत मिळतात, याबाबतही उल्लेख आहे. पौराणिक मान्यतेनुसार, मृत्यूपूर्वी काही विशिष्ट लक्षणे व्यक्तीला अनुभवास येतात. ती लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
सावली न दिसणे
गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीची सावली पाणी, तेल, तूप किंवा आरशात दिसेनाशी झाली, तर ते मृत्यू जवळ आल्याचे संकेत मानले जातात. त्यामुळेच म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची सावलीही साथ सोडते.
कान बंद केल्यावर आवाज न ऐकू येणे
दोन्ही कान बोटांनी बंद केल्यानंतर कोणताही आवाज ऐकू येत नसेल, तर हा मृत्यू जवळ असल्याचा एक संकेत असल्याचे गरुड पुराणात सांगितले आहे.
पूर्वजांचे दर्शन होणे
मृत्यू जवळ आल्यावर अनेक वेळा व्यक्तीला आपले पूर्वज दिसू लागतात किंवा ते हाक मारत असल्याचा भास होतो, अशी मान्यता आहे. हा संकेत आत्म्याच्या पुढील प्रवासाशी जोडला जातो.
हातावरील रेषा फिकट किंवा नाहीशा होणे
तळहातावरील रेषा हलक्या पडणे किंवा हळूहळू अदृश्य होणे, हे देखील मृत्यू जवळ आल्याचे लक्षण मानले जाते. गरुड पुराणात असेही नमूद आहे की मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी तळहातावरील रेषा पूर्णपणे अदृश्य होऊ शकतात.
अशुभ चिन्हे दिसणे
गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी काही लोकांना अशुभ चिन्हे जाणवतात. उदाहरणार्थ, स्वतःची सावली कोणत्याही प्रतिबिंबात न दिसणे किंवा वातावरण बदलल्यासारखे वाटणे.
पूर्वजांचे आत्मे आजूबाजूला असल्याची जाणीव
असे म्हटले जाते की मृत्यू जवळ आल्यावर व्यक्तीला आपल्या आजूबाजूला पूर्वजांचे अस्तित्व जाणवते. पौराणिक श्रद्धेनुसार, आत्मा पुढील प्रवासासाठी तयार होत असल्याचे हे चिन्ह मानले जाते.
कुत्र्याचे असामान्य वर्तन
जर घरातील कुत्रा एखाद्या व्यक्तीचा सतत पाठी लागू लागला आणि हे काही दिवस सुरू राहिले, तर गरुड पुराणात याला मृत्यूशी संबंधित संकेत मानले गेले आहे
गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वत:चे नाक दिसणे बंद होते किंवा ती व्यक्ती आपल्या नाकाचे टोक पाहू शकत नाही.
मृत्यू येण्याआधी एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसू लागतात, जसे की विझलेला दिवा पाहणे. किंवा पूजेचा दिवा विझल्यानंतर त्या व्यक्तीला दिवा विझण्याचा वास येत नसेल तर समजावे की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. कधीकधी यमदूत त्याच्या जवळ अशा प्रकारे दिसू लागतात की, अशावेळी त्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत.
ही सर्व लक्षणे धार्मिक आणि पौराणिक श्रद्धांवर आधारित आहेत. त्यांचा उद्देश मृत्यूची भीती निर्माण करणे नसून जीवन, कर्म आणि आत्म्याच्या प्रवासाबाबत माणसाला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणे हा आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

