( मुंबई )
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज निधन झाले आहे. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या आजी होत.
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत. मात्र, लग्नापूर्वीच शालिनीताई पाटील राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. वसंतदादांच्या सावलीत न राहता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
उच्चशिक्षित, अभ्यासू आणि राजकारणातील बारकावे अचूकपणे समजून घेणाऱ्या शालिनीताई, वसंतदादांच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. सुरुवातीला त्यांनी वसंतदादांसाठी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांची राजकीय समज, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमतेची ओळख निर्माण झाली आणि तेथूनच त्यांच्या राजकीय महत्त्वाला खरी धार मिळाली. शालिनीताई पाटील यांनी पती वसंतदादा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत खंबीर साथ दिली. तसेच स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई पाटील या आजारी होत्या. उपचारासाठी त्या मुंबईतील निवासस्थानीच होत्या. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव (मूळ गाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शालिनीताई पाटील : राजकीय प्रवास व परिचय
- माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी
- जन्म १९३१ आणि निधन २० डिसेंबर २०२५
- पहिले पती – श्यामराव जाधव
- सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या आजी
- १९८० च्या दशकात काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपद
- १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या राजीनाम्यात मोलाची भूमिका
- १९९९ ते २००९ या कालावधीत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव
- विधानसभा मतदारसंघातून आमदार
- सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
- १९९० व १९९५ मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक, मात्र पराभव

