(ठाणे)
कल्याणमध्ये एका रॅपिडो बाइक चालकावर तरुणीवर बलात्कार आणि लुटीचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अॅपआधारित बाइक टॅक्सी सेवांमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे 7 वाजता तरुणीने जीमला जाण्यासाठी रॅपिडो अॅपवरून बाईक बुक केली होती. बाईक तिच्या घराजवळ आली आणि ती चालकाला ओटीपी सांगून बाईकवर बसली. दरम्यान, आरोपी चालकाने बाईक जोरात चालवत तिला अन्य सुनसान ठिकाणी नेले.
तरुणीला त्याच्या हालचालीवर संशय आला आणि तिने बाईकवरून उडी मारली, पण आरोपीने जबरदस्ती करत तिला झाडाझुडपात ओढत नेले. या प्रसंगी तरुणीच्या पायाला दुखापत झाली. आरोपीने बलात्काराचा प्रयत्न केला, तरुणीने प्रतिकार केला असता त्याने चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याची चेन आणि जवळ असलेले 1,000 रुपये घेतले. त्यासोबतच आरोपीने स्प्रे कॅन दाखवत अॅसिड फेकण्याची धमकी दिली, ज्यामुळे तरुणी अधिकच घाबरली.
शेवटी, तरुणीने धैर्य दाखवत आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि आरोपीला पकडून चोप दिला. त्यानंतर आरोपी सिद्धेश संदीप परदेशी याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
कल्याण पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, ही घटना अॅपआधारित बाइक सेवा वापरणाऱ्या नागरिकांसाठी इशारा ठरली आहे.

