( नागपूर )
90 च्या दशकात संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या ‘तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले आहे. रविवारी रात्री नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी संगीतविश्व आणि नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अल्ताफ राजा यांच्या आवाजातील ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे गाणं 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं होतं. प्रेमभंग, विरह आणि भावनिक शब्दांनी सजलेलं हे गाणं त्या काळात तरुणांच्या ओठांवर अक्षरशः राज्य करत होतं. आजही या गाण्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
‘तुम तो ठहरे परदेसी’ने देशभर गाजवली होती लोकप्रियता
हे गाणं सुरुवातीला स्थानिक पातळीवर सादर केलं जात होतं. मात्र, अल्ताफ राजा यांच्या खास गायकीमुळे ते रातोरात सुपरहिट ठरलं. त्या काळात हॉटेल्स, पानपट्ट्या, बसस्थानके, चहाच्या टपऱ्या आणि गल्लीबोळात हे गाणं सतत ऐकू येत असे. कॉलेज गॅदरिंगपासून ते ऑर्केस्ट्रापर्यंत सर्वत्र या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत होती.
या गाण्यामुळे अल्ताफ राजा यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. संगीत कंपन्यांनाही मोठा आर्थिक फायदा झाला. मात्र, या अमर गीताचे शब्द लिहिणारे जहीर आलम यांना त्यामानाने प्रसिद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळाले नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
संघर्षमय आयुष्य, आर्थिक विवंचनेतच काळ गेला
जहीर आलम नागपूरमधील मोमीनपुरा परिसरातील एका छोट्या घरात वास्तव्यास होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते एकेकाळी एम्प्रेस मिलमध्ये नोकरी करत होते. मात्र, मिल बंद पडल्यानंतर त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं. त्यानंतरही त्यांनी लेखन सुरू ठेवलं, पण त्यांना अपेक्षित मान-सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळालं नाही. संगीतविश्वात इतिहास घडवणारे शब्द लिहूनही त्यांचे आयुष्य आर्थिक विवंचना आणि उपेक्षेत गेले, याबद्दल नागपूरच्या साहित्य आणि सांस्कृतिक वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे.
हिंदी संगीतविश्वातील दुर्लक्षित हिरा हरपला
‘तुम तो ठहरे परदेसी’ या एका गाण्याने जहीर आलम यांना अमरत्व दिलं. त्यांच्या शब्दांनी लाखो प्रेमभंग झालेल्या तरुणांच्या भावना व्यक्त केल्या. आजही हे गाणं सोशल मीडियापासून स्टेज शोपर्यंत लोकप्रिय आहे. जहीर आलम यांच्या निधनामुळे हिंदी संगीतविश्वातील एक महत्त्वाचा, पण काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला गीतकार कायमचा हरपल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

