(खेड)
यशाला कधीही शॉर्टकट नसतो कठोर मेहनतीनेच यश मिळते. जे करायचे त्यात आपल्यातील 100% देण्याची तयारी ठेवावी लागते. कोणतेही काम आनंदाने केले तरच ते यशस्वीपणे पूर्ण होते. आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेऊन इंडियन नेव्ही मध्ये एरोनॉटिक्स या विभागामध्ये भरती झालेला आशिक भिकू जानकर याचा हा इथपर्यंतचा प्रवास स्वप्नवतच म्हणावा लागेल.
खेड तालुक्यातील प्रत्येक युवकाचे एकच स्वप्न असते ते म्हणजे सैन्य दलात भरती होणे. हेच स्वप्न उरी बाळगून आशिक याने लहानपणापासूनच सैन्य दलात जाण्याचा निश्चय केला. त्याच्या या निर्णयाला त्याचे शिक्षक असलेले आई-वडील भिकू जानकर व सौ किरण जानकर मॅडम यांचे पाठबळ लाभले.
सह्याद्रीच्या कुशीत व रसाळगडच्या पायथ्याशी वसलेल्या सणघर गावात आशिक चा जन्म झाला आशिक चे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव खेड येथे झाले. लहानपणापासूनच प्रत्येक खेळात हुशार असलेला आशिक एक उत्तम धावपटू म्हणून उदयास आला. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने शंभर मीटर व दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये यश मिळवले. शालेय स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत भाग घेऊन त्याने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले.
आशिकने आपला मार्ग निवडला होता. त्याला भारतीय सैन्य दलामध्ये भरती व्हायचे होते. खरंतर शिक्षकांची मुलं डॉक्टर व इंजिनियर हे क्षेत्र आपल्यासाठी निवडतात. पण आशिकने सैन्य दलात भरती होऊन देश सेवा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी अफाट मेहनत घेण्याची त्याची तयारी होती. बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये अशिकने उत्तम गुण मिळवून अभ्यासातली आपली हुशारी दाखवून दिली.
बारावीनंतर काही दिवस त्याने नॅशनल अकॅडमी बोरज येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर इंडियन नेव्ही च्या लेखी परीक्षेत उत्तम गुणांनी यशस्वी होऊन शारीरिक चाचणी ही यशस्वीरित्या पार केली. व आई-वडिलांनी आशिक साठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करत आशिक इंडियन नेव्ही मध्ये रुजू झाला. इंडियन नेव्ही चे खडतर असे प्रशिक्षण सहजपणे पार पाडत नुकताच आशिक हा कोचीन येथे इंडियन नेव्ही च्या एरोनॉटिक्स विभागामध्ये देशाची सेवा करण्यासाठी रुजू झाला.
देश सेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या आशिकच्या या मेहनतीला व कठोर परिश्रमाला तोड नाही.
नुकताच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडतर्फे आशिक याचा सत्कार करण्यात आला व त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर, पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत, विद्यमान संचालक सुनील दळवी, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, दिलीप यादव, ऑडिटर बबन मोरे, सल्लागार परशुराम पेवेकर, संतोष यादव, संजय गडाळे, सहसचिव दिनेश पवार, प्रमोद कदम, येडू केकान, महिला प्रतिनिधी स्वाती यादव, विद्या घडशी, यांच्यासह सचिन गावडे, सुनील वाघमारे, राजाराम दरेकर, अनिल आंजर्लेकर, गोपीनाथ पवार, प्रीतम पाटील आदी शिक्षक समिती सभासद उपस्थित होते.

