(नवी मुंबई)
नवी मुंबईतील सीवूड्स-नेरुळ परिसरात दिवसाढवळ्या ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सेक्टर ४२ए येथील नीळकंठ प्राइड सोसायटीमधील संगम गोल्ड या सराफा दुकानात बुरखाधारी दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर सुमारे २५ लाख रुपयांचे सोने लुटले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सोमवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता तीन बुरखा घातलेले आरोपी सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले. सुरुवातीला ते महिला ग्राहक ‘पुरुष’ असल्याचा संशय मालकांना आला नाही. मात्र, बोलताना ते हिंदी भाषेत बोलत असल्याचे लक्षात येताच ते पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एकाने दुकानातील कर्मचारी सुनील शर्मा (वय ४२) यांच्यावर पिस्तुल रोखत आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. उर्वरित दोघांनी काउंटरमधील सर्व सोन्याचे दागिने गोळा केले.
दरोडेखोरांनी सुमारे २५० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच काउंटरवरील ३५ हजार रुपये रोख रक्कम लुटली. लुटीनंतर चौघेही एका वाहनातून पसार झाले. यामध्ये एक साथीदार दुकानाबाहेर थांबून पाळत ठेवत होता.
या प्रकरणी एनआरआय कोस्टल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील दरोडा आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी डिटेक्शन शाखेची चार पथके तसेच गुन्हे शाखेच्या चारही युनिट्सची प्रत्येकी एक पथके तयार करण्यात आली आहेत.
रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून दरोडेखोर पळून गेलेल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक मिळाल्याची माहिती एसीपी (झोन-२) मयूर भुजबळ यांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

