(विशेष /प्रतिनिधी)
पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील प्रभावी समन्वयाच्या बळावर जिल्ह्यात शिंदेसेना–भाजप महायुतीने नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. याउलट, नेतृत्वाचा अभाव, अंतर्गत दुरावा आणि समन्वयशून्य लढा यामुळे महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले.
जिल्ह्यातील सात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी सहा ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष विराजमान झाले असून, केवळ राजापुरात महाविकास आघाडीला नगराध्यक्षपद मिळाले आहे. तीन नगर परिषद आणि तीन नगर पंचायतींवर महायुतीची पूर्ण सत्ता प्रस्थापित झाली आहे. राजापुरात मात्र युती आणि आघाडी यांना समसमान यश मिळाले. काही ठिकाणी तीन ते चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणुका झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यातच मागील निवडणुकीतील चार प्रमुख पक्षांचे सहा गट झाल्याने बंडखोरीचे प्रमाण वाढले आणि निवडणूक रंगतदार ठरली.
महायुतीकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण निवडणूक रणनितीचे नेतृत्व केले. राज्यमंत्री योगेश कदम यांनी भाजप नेत्यांशी सुसंवाद राखत युतीची मोट घट्ट बांधली. भाजपकडून अॅड. दीपक पटवर्धन तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिनिधी अनिकेत पटवर्धन यांनी समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. याच एकसंध नेतृत्वामुळे महायुतीला निर्णायक विजय मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
रत्नागिरीत आघाडीचा विसंवाद ठळक
उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीत रत्नागिरीत समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून आला. निवडणुकीआधीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील अनेक पदाधिकारी बाहेर पडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. हा उद्धवसेनेला बसलेला पहिला मोठा धक्का ठरला.
यानंतर जागावाटपावरून काँग्रेसनेही आघाडीतून माघार घेतली. परिणामी केवळ उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची अपुरी युती उरली. या विसंवादाचा फटका बसत ३२ पैकी केवळ ३ जागांवर आघाडीला समाधान मानावे लागले, तर महायुतीने २९ जागांसह नगराध्यक्षपदही आपल्या ताब्यात घेतले.
खेडमध्ये युतीची क्लीन स्वीप
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड नगर परिषदेवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले. २० पैकी एकही जागा विरोधकांना मिळाली नाही. शिंदेसेनेने १७ आणि भाजपने ३ जागांवर लढत दिली आणि सर्व उमेदवार विजयी झाले. भाजपमधील संभाव्य बंडखोरी योगेश कदम यांनी वेळीच शमविल्याने विरोधक पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
चिपळुणात फाटाफूट, निकाल धक्कादायक
चिपळूण नगर परिषदेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंमध्ये फाटाफूट झाली. महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडली, तर आघाडीतून काँग्रेस बाजूला झाली. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र असतानाही अंतर्गत बंडामुळे समन्वय राहिला नाही. परिणामी बहुरंगी लढतीत शिंदेसेनेचे उमेश सकपाळ यांनी माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव केला. २८ पैकी १६ जागा महायुतीला मिळाल्या.
राजापुरात गड आला, पण सिंह निसटला
राजापुरात शिंदेसेनेने उद्धवसेनेवर मात केली असली, तरी नगराध्यक्षपद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी पटकावले. काँग्रेसचे पारंपरिक मतदार टिकून राहिल्याने युतीला येथे संपूर्ण सत्ता मिळवता आली नाही. सभागृहात दोन्ही बाजूंना समसमान प्रतिनिधित्व राहणार आहे.
देवरुख, लांजा आणि गुहागरमध्ये युतीचे वर्चस्व
देवरुख नगर पंचायतीत उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर महायुतीने बहुमत मिळवले. लांजात अपक्ष उमेदवारांच्या यशाचा फटका महाविकास आघाडीला बसला, तर गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या बालेकिल्ल्यातच युतीने जोरदार धक्का दिला.

