(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील शिंदे आंबरी गावची सुकन्या तेजल शिंदे हिची अमरावती येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर तिचे गावाला आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी तिचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यात आले.
तेजलचे प्राथमिक शिक्षण शिंदे आंबेरी येथील प्राथमिक शाळेत झाले. दुसरीत असताना पित्याचे छत्र हरपले. इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई इथे पार पडले. २०११ साली दहावीत असतानाच अचानक आईने जगाचा निरोप घेतला. तरीदेखील त्याचा आपल्या अभ्यासावर परिणाम न होऊ देता तिने शाळेत तिसरा क्रमांक पटकावला. पुढील शिक्षण तिने सावर्डे येथील सह्याद्री महाविद्यालय येथे पूर्ण केले. तिने इंग्लिश लिटरेचर मध्ये बी.ए.पूर्ण केले. २०१७ पासून तिने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
तेजलने २०१८ साली पीएसआय ची पूर्वपरीक्षा दिली. २०१९ ला पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली. २०२० ला मुख्य परीक्षा व मुलाखत झाली. नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान तिचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे पूर्ण झाले. याआधी तिने पोस्ट खात्यात सप्टेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान बी.पी.एम पदावर नोकरी केली. तिच्या वाटचालीत तिचे काका प्रमोद शिंदे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी तेजलला आईबापाची उणीव भासू दिली नाही. ते सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
तेजलच्या यशाबद्दल तिची शिंदे आंबेरी ते कडवई अशी मिरवणूक काढण्यात आली. भाईशा घोसाळकर हायस्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यळगुडकर, सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंके यांनी तिचा यथोचित सन्मान केला .सत्काराला उत्तर देताना तेजलने शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ती म्हणाली की, सध्याच्या काळामध्ये मुलींनी स्वतःला कमी समजू नये. चूल आणि मूल ही स्थिती भारतामध्ये अनेक वर्षांपूर्वी बंद झाली. सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शैक्षणिक वारसा आज महिलांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. त्याची जाणीव प्रत्येक मुलीला असली पाहिजे. उच्चशिक्षित होऊन आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून जर प्रयत्न केले आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो हा विश्वास प्रत्येक मुलीने आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे आणि जिद्दीने आपल्या परिवारासाठी आपल्या देशासाठी आपल्याला जे काही चांगलं करता येईल ते करत राहिले पाहिजे.
या कार्यक्रम प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेत आगमन झाल्यावर एनसीसी कॅडेट व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी तेजलला मानवंदना दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.