(संगमेश्वर / एजाज पटेल)
बँकेत गेल्यावर अनेकदा आपल्याला मोठी गर्दी दिसते. लोक ताटकळत रांगेत उभे आहेत, असं चित्र दिसतं. तुम्ही तिथल्या लोकांना जेव्हा विचारणा करता तेव्हा कळत की कर्मचाऱ्यांचा लंच टाईम झालाय आणि त्यांनी काऊंटर बंद केले आहेत. आता काहीच पर्याय नसतो. बँक कर्मचाऱ्यांशी कोण वाद घालत बसणार म्हणून आपणही रांगेत ताटकळत उभे राहतो. तासाभराने बँक कर्मचारी येतात आणि मग कामाला सुरुवात करतात. यात आपला महत्वाचा वेळ वाया गेलेला असतो. खरे तर बँक कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे ग्राहकांना ताटकळत ठेवता येत नाही. याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे काही नियम आहेत. ग्राहकांना हे नियम माहिती नसल्यामुळे त्यांचा अमुल्य असा वेळ वाया जातो. बँकांच्या ‘लंच टाईम’ बाबत RBI ची नियमावली आहे.
बँकांच्या ‘लंच टाईम’ (Lunch Time) बाबत, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, बँका लंच ब्रेक दरम्यान संपूर्णपणे बंद होऊ शकत नाहीत. कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी लंच ब्रेक घेता कामा नये, तर ते एकामागून एक लंच ब्रेक घेऊ शकतात, ज्यामुळे ग्राहकांना सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील. बँक कामकाजादरम्यान ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुरेसा कर्मचारी उपलब्ध ठेवावा, तसेच पूर्ण वेळ कामकाज व्यवस्थित चालू ठेवण्याची जबाबदारी बँकांची असते.
असे नियम असताना, संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच बँक कामकाजाच्या वेळा ठरवून घेतल्या आहेत. दुपारी जेवणासाठी शाखा चक्क कुलूपबंद करून ग्राहकांना बाहेर ताटकळत ठेवण्याचा नियमच जणू येथे करण्यात आला असून ग्राहकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील सेवेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
डिजिटल व्यवहारात होणारी फसवणूक, तसेच बुडीत निघणाऱ्या खाजगी बँका यामुळे ग्राहकांचा राष्ट्रीयकृत बँकांवर अधिक विश्वास राहिला असून राष्ट्रीयीकृत बँकांकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. परंतु येथून सर्वसामान्य ग्राहकांना मिळणारी वागणूक तसेच देण्यात येणाऱ्या सेवेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. त्याचे उत्तम उदाहरण संगमेश्वर बाजारपेठ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून दिसून येत आहे. संगमेश्वर तालुका हा ७० टक्के ग्रामीण भागात व्यापलेला तालुका असल्याने सहाजिकच ग्रामीण भागातील लोकांचे व्यवहार संगमेश्वर बाजारपेठेतील शाखेवर अवलंबून असतात. परंतु येथेच ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
या शाखेच्या आत आणि बाहेर बँकेचे कामकाज वेळापत्रक लावण्यात आले असून त्यामध्ये दुपारी २ ते २.३० जेवणाची वेळ ठरवण्यात आली आहे. परंतु आरबीआयच्या नियमानुसार जेवणाची अधिकृत सुट्टी देण्यात आलेली नाही. जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी आपसात ठरवून जेवण करून घ्यावे, बँक कामकाज बंद करता येणार नाही. तसेच शाखा देखील बंद ठेवता येणार नाही, दरवाजा ओढून घेता येणार नाही आणि यामुळे ग्राहकांच्या सेवेत खंड पडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश असताना संगमेश्वर शाखेत मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
दुपारी जेवणासाठी शाखा चक्क कुलूपबंद केली जाते. त्यामुळे ग्राहकांना बाहेर ताटकळत रहावे लागते. आमची जेवणाची वेळ आहे, असे कर्मचारी बेधडक सांगतात. इतकेच नव्हे तर येथील अधिकारी वर्गाचे कामकाज चक्क शिपाई पाहत असल्याचे देखील ग्राहकांना दिसून आले आहे. अधिकाऱ्यांचे अधिकार जर शिपाई वापरत असेल तर त्या बँकेतून ग्राहकांना कोणती सेवा मिळणार, आणि तो कारभार कसा होत असेल असे प्रश्न ग्राहक संतप्त चर्चेतून उपस्थित होत आहे. राष्ट्रीयकृत बँकेकडून जर अशी सेवा मिळत असेल तर सर्वसामान्य ग्राहकांनी व खातेदारांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न विचारला जात आहे. या बाबत काही ग्राहकांनी थेट वरिष्ठ कार्यालय अधिकाऱ्यांशी फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ग्राहकांना वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करण्यासाठी बँकेत लावण्यात आलेल्या फलकावरील संपर्क नंबर हे कशासाठी आहेत असा प्रश्नसुद्धा उपस्थितीत केला आहे.