(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यास, स्पर्धा आणि इतर कारणांमुळे वाढणारा मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती शालेय स्तरावर समुपदेशनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक शाळेत समुपदेशनासाठी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अडचणीच्या काळात त्वरित संपर्क साधता यावा, यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये अधिकृत हेल्पलाइन क्रमांक छापण्यात येणार आहे. त्यामुळे संकटाच्या क्षणी विद्यार्थ्यांना तात्काळ मानसिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
तणावमुक्त शिक्षण वातावरण निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे प्रशिक्षण, वैयक्तिक समुपदेशन आणि वेळेवर मार्गदर्शन मिळावे, यासाठी ऑनलाईन समुपदेशनाची प्रतिकृती (मॉडेल) विकसित करण्यात येणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज आहे हे वेळेत ओळखता यावे, यासाठी शिक्षकांचेही समुपदेशन करण्यात येणार असून अविरत शिक्षण उपक्रमांतर्गत त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासही प्राधान्य दिले जाणार असून शिक्षणक्षेत्रात अधिक सकारात्मक, संवेदनशील आणि तणावमुक्त वातावरण निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.

