(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर उभी आहे. मात्र, हीच यंत्रणा सावरणारे डॉक्टर गेले पाच महिने वेतनाविना काम करत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन उपजिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे रिक्त राहिल्याने आरोग्य सेवा अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेली होती. ही कोलमडलेली व्यवस्था सावरण्यासाठी शासनाने प्रति महिना ४० हजार रुपये मानधनावर १०२ बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली. या डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत २४ तास रुग्णसेवा सुरू ठेवली आहे.
मात्र, जुलै २०२५ पासून या कंत्राटी डॉक्टरांना अद्याप एक रुपयाचाही पगार मिळालेला नाही. सलग पाच महिन्यांचा पगार थकल्याने डॉक्टरांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. बँकांचे हप्ते थकले असून मुलांच्या शाळेच्या फीचा प्रश्न गंभीर झाला आहे. घरातील वृद्ध आई-वडिलांच्या उपचारांचा खर्च भागवणेही अनेकांसाठी अशक्य होत चालले आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जिवावर उदार होऊन सांभाळणाऱ्या डॉक्टरांनाच त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पगाराअभावी या डॉक्टरांची गणपती आणि दिवाळी यंदा कोरडी गेली. आता नववर्षाच्या उंबरठ्यावर तरी थकलेले वेतन मिळणार का, असा प्रश्न या १०२ कंत्राटी डॉक्टरांना सतावत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत वेतन अदा करावे आणि या डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य पूर्ववत करावे, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातून पुढे येत आहे.

