(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका नागरिकाची तब्बल अकरा लाख साठ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या एका अज्ञात महिलेने स्वतःला ट्रेडिंग सल्लागार म्हणून भासवून हा बनावट ‘गोल्ड ट्रेडिंग’ घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्यात गुंतवणूकदार कशा प्रकारे अडकत आहेत, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ही फसवणूक ४ जुलै २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत फिर्यादींच्या रत्नागिरीतील राहत्या घरी घडली. फिर्यादींची फेसबुकवर ‘मारिया’ नावाच्या महिलेबरोबर ओळख झाली. काही दिवसांच्या संवादानंतर तिने स्वतःला ट्रेडिंग सल्लागार म्हणून सादर केले. “गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत भरघोस परतावा मिळेल,” असे आमिष दाखवत तिने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. यानंतर मारियाने व्हॉट्सअँपद्वारे ‘TRADNGBEAD’ नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे गुंतवणुकीच्या नावाखाली वेळोवेळी मोठ्या रकमेचे व्यवहार करून घेतले गेले. मात्र काही दिवसांनी कोणताही लाभ न मिळाल्याने फिर्यादींनी मूळ रकमेबाबत विचारणा केली असता, कंपनीच्या तथाकथित प्रतिनिधींनी “अकाउंट संशयास्पद ठरले असून, रक्कम परत मिळवण्यासाठी आधी ६.१३ लाख रुपये भरावे लागतील” असा बहाणा करून त्यांची अधिकच बोळवण केली.
फिर्यादींना कोणताही परतावा न देता विविध कारणांनी पैसे भरण्यास भाग पाडत आरोपींनी एकूण ₹११,६०,००० रुपयांचा गंडा घातला. अखेर पीडित व्यक्तीने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी ‘मारिया’, ‘TRADNGBEAD’ कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित अकाऊंट होल्डर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून या टोळीचा मागोवा घेण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे सखोल विश्लेषण सुरू आहे.
सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे की अल्पावधीत मोठा नफा मिळवून देणाऱ्या ऑनलाईन ट्रेडिंग योजना बहुतेक वेळा फसवणुकीच्या असतात. अशा कोणत्याही लिंक, ऍप्लिकेशन किंवा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.

