(रत्नागिरी)
तालुक्यातील उंडी समुद्रकिनारी मासेमारी करताना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक मच्छीमार पाण्यात वाहून गेला. काही वेळाने वानाजवळील खडकाळ भागात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण गणपत गावणकर (वय ५६, रा. उंडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे. ही घटना १४ जुलै २०२५ रोजी सकाळी घडली.
गावणकर हे उंडी समुद्रकिनारी मासेमारी करत असताना अचानक समुद्राच्या पाण्याचा जोरदार प्रवाह ओढावला. अंदाज न आल्याने ते त्यात वाहून गेले. काही वेळाने वानाजवळील खडकाळ भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा, ता. जि. रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात अमृ. क्रमांक २१/२०२५ प्रमाणे करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. १९४ नुसार पुढील तपास सुरू आहे. समुद्रकिनारी मासेमारी करणाऱ्या स्थानिकांमध्ये या घटनेने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.