(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या निकृष्ट व निष्काळजी कामामुळे हा रस्ता आता प्रवासासाठी नव्हे, तर अपघात, आजार आणि मृत्यूला आमंत्रण देणारा महामार्ग बनत चालला आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदार, मनमानी आणि सुलतानशाही कारभारामुळे संगमेश्वरकर अक्षरशः धुळीत गुदमरून जगत आहेत. मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही संबंधित प्रशासन अजूनही गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.
महामार्गावर ठिकठिकाणी माती, काँक्रीट, गिट्टी व गौण खनिजे टाकून ठेवण्यात आली आहेत. निकामी साहित्यही थेट रस्त्यावर टाकण्यात आले असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना, सूचना फलक किंवा अडथळे सूचना येथे दिसत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा महामार्ग वाहनचालकांसाठी थेट मृत्यूचा सापळा ठरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
संगमेश्वर परिसरातील संपूर्ण महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले असून अनेक दिवस पाणी मारलेलेच झालेली नाही. मटेरियल वाहून नेणारे ट्रक झाकले जात नसल्यामुळे रस्त्यावर सतत धुरळा उडत आहे. वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसून अपघात टळत असतील, तर ते केवळ नशिबावरच अवलंबून असल्याचे नागरिक सांगत आहेत.
या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक, प्रवासी आणि संगमेश्वरमधील नागरिकांच्या फुफ्फुसात विषारी कण जात आहेत. लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास, वृद्धांचे आजार बळावत असून डोळ्यांची जळजळ, दम्याचे झटके व श्वसन विकार वाढताना दिसत आहेत. मात्र ठेकेदार मात्र कोणतीही जबाबदारी न स्वीकारता मग्रुरीत कामे रेटत असल्याचा आरोप होत आहे.
हा बेजबाबदार कारभार रोखण्याची जबाबदारी ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व स्थानिक प्रशासनावर आहे, ते नेमके कुठे गायब आहे? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच कारवाई होणार आहे का? ठेकेदाराला मोकळे रान देणारे अधिकारी कोण, असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
दररोज संगमेश्वर महामार्गावर नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असताना प्रशासनाची शांतता संशयास्पद ठरत आहे. तात्काळ धूळ नियंत्रण, नियमित पाणी मारणी, सुरक्षा फलक, वाहतूक नियंत्रण आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर भविष्यात होणाऱ्या प्रत्येक अपघाताची व आजाराची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवरच राहील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

