(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे रहिवासी भरत कृष्णा चव्हाण हे गेली चार दशके मुक्या जनावरांच्या सेवेत कार्यरत आहेत. मेघी व पाली या टपाल कार्यालयांत काम करून सेवानिवृत्त झालेले भरत चव्हाण आजही विनामोबदला गाई–म्हशींच्या प्रसूतीवेळी होणाऱ्या अडचणींवर उपचार करतात. त्यामुळे गावोगावी त्यांना देवळेचे “देवदूत” म्हणून ओळखले जाते.
रात्र असो वा दिवस, कधीही कोणाचा फोन किंवा निरोप मिळाला की भरत चव्हाण तातडीने घटनास्थळी धाव घेतात. अडलेल्या गाई–म्हशींना मुक्त करण्यासाठी ते वेळप्रसंगी भाड्याने वाहन घेऊनही पोहोचतात. गोठ्यात पोहोचल्यावर कुठलेही मान–पान न घेता ते थेट उपचाराला सुरुवात करतात. प्रसूतीदरम्यान जनावरांना किती वेळ त्रास होत आहे याचा अंदाज घेऊन वासरू जिवंत असल्यास त्याला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, तर मृत वासरू असल्यास तेही काळजीपूर्वक बाहेर काढले जाते.
मुक्या जनावरांच्या यातना मालकाला सांगता येत नाहीत, अशा वेळी भरत चव्हाणच त्यांना दिलासा देतात. मात्र उपचार करण्यापूर्वी ते नेहमीच मालकाला विचारतात – “पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेतला का?” आणि स्वतः उपचार केल्यानंतरही ते डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस करतात. यामागे जनावरांना कोणताही त्रास होऊ नये, हीच त्यांची भूमिका असते.
या अविरत सेवेचा कुठे गाजावाजा नाही, ना प्रसिद्धी. एवढंच काय तर चहा–पाणीही ते घेत नाहीत. समाजाप्रती नि:स्वार्थ भावनेतून त्यांनी आयुष्यभर ही सेवा चालवली आहे आणि आज निवृत्तीनंतरही तीच सेवा जोमाने सुरू आहे. खऱ्या अर्थाने मुक्या जनावरांचे रक्षणकर्ते ठरलेले भरत चव्हाण यांना सलाम!

