(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात संगमेश्वर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून प्रवाशांना आणि इतर वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी (२ जून) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली.
एसटी स्टँड परिसर, मुख्य बाजारपेठ तसेच देवरुख मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत पहिली कारवाई सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर-देवरुख मार्गावरील मालप इलेक्ट्रिकल दुकानासमोर करण्यात आली. सांगली येथील चालक प्रकाश पांडुरंग गुरव याने आपला टेम्पो रस्त्यात उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश जयकर पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दुसरी कारवाई करण्यात आली. सायंकाळी ६.२५ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर एसटी स्टँड ते बाजारपेठ या वर्दळीच्या मार्गावरील संगम स्वीट मार्टसमोर लांजा येथील चालक सतीश सदाशिव जाधव याने आपली ओम्नी गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल शंकर गोपाळ चव्हाण यांनी त्याच्याविरोधातही भारतीय न्यायसंहिता कलम २८५ नुसार गुन्हा नोंदवला.
या धडक कारवाईमुळे पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला असून, यापुढे वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये घबराट पसरली असून, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

