(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रिसील डॉट इनच्या यंदाच्या महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड २०२५ साठी पावस येथील मयूर मॅंगो सप्लायर अँड मॅंगो पल्पचे संचालक संदीप यशवंत पावसकर यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण १ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथे करण्यात आले. सदर पुरस्कार उद्योजिका व अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रिसीलचे संस्थापक व महाराष्ट्रातील सर्व उद्योजक मंडळी प्रमुख उपस्थित होती. महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने उद्योजक संदीप पावसकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आज कौतुक सोहळा
कोकणातील हापूस आंबा देशभरातील नामांकित कंपन्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असताना मयूर मॅंगो सप्लायर अँड मॅंगो पल्पने रत्नागिरी व सिंधुदुर्गचे नाव उंचावले आहे. याबाबत संदीप यशवंत पावसकर यांचा गौरव करण्यासाठी सिंधुरत्न आंबा व्यापारी संघ (सिंधुदुर्ग / रत्नागिरी) यांच्या वतीने आज रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रवींद्र (अण्णा) सामंत (प्रसिद्ध उद्योजक), आमदार किरण सामंत (लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघ), माजी आमदार राजन साळवी, विजयशेठ देसाई (आंबा उद्योजक व निर्यातदार – विजय कॅनिंग), आनंद देसाई (आंबा उद्योजक व निर्यातदार), बिपिन बंदरकर (शिवसेना शहरप्रमुख), विजय खेडेकर (शिवसेना उपशहरप्रमुख), संजय साळवी (माजी उपनगराध्यक्ष रत्नागिरी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्थानिक शेतकरी, बागायतदार तसेच नागरिकांनी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुरत्न आंबा व्यापारी संघच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रेरणादायी प्रवास
१९९७ मध्ये पावस येथील पुण्यभूमीतून ‘मयूर मॅंगो सप्लायर’ व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या संदीप पावसकर यांचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे. सुरुवातीला पावस आणि नंतर दशक्रोशीत फिरून घराघरांतून त्यांनी आंबे गोळा केले आणि विक्रीस सुरुवात केली. शेतकरी आणि आंबा बागायतदारांच्या घरी जाऊन हापूस आंबे गोळा करून ते थेट मोठ्या शहरातील डीलरकडे पोहोचवले. प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहारामुळे त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला, त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासली नाही. त्यानंतर देशातील नामांकित कंपन्यांचाही त्यांनी विश्वास संपादन केला.
२००२ मध्ये त्यांनी मोठा टप्पा पार केला. गुजरातच्या वाडीलाल आईस्क्रीम कंपनीने त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि हापूस आंब्यांच्या गुणवत्तेमुळे मोठी ऑर्डर दिली. यानंतर अलाना फूड्स, जैन फार्म (जळगाव) यांसारख्या कंपन्याही या यादीत सामील झाल्या. पुढे आयटीसी, होको, हॅवमोर, मदर डेअरी, देसाई ब्रदर्स, विजय कॅनिंग यांसारख्या मोठ्या कंपन्यांना महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या राज्यांत आंबा पुरवठा सुरु झाला.
मयूर मॅंगो पल्पची सुरुवात
संदीप पावसकर यांनी जाणले की केवळ आंबा विकण्यापलीकडे जाऊन मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. त्यातून मयूर मॅंगो पल्पची स्थापना झाली. सुरुवातीला काही अडचणी आल्या तरी उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे त्यांनी ग्राहकांची मने जिंकली. आज हा ब्रँड देशातील अनेक शहरांत हापूस आंब्याचा रस पुरवत आहे आणि त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यांनी हापूस आंब्याला पुन्हा जगाच्या नकाशावर नेऊन कोकणची शान उंचावली आहे.
तरुणांसाठी प्रेरणादायक
हापूस आंबा बागायतदार तसेच आजच्या तरुण पिढीसाठी हा प्रवास प्रेरणादायी आहे. कोकणातील शेतकरी किंवा तरुणांनी नोकरीसाठी मोठ्या शहरांत न जाता स्वतःच्या भागात आंबा किंवा इतर फळ लागवड करून किंवा आंबा खरेदी-विक्री व्यवसायातून मोठा पल्ला गाठता येतो हे संदीप पावसकर यांनी सिद्ध केले आहे.
यशाचे श्रेय कुटुंबीयांना
महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड २०२५ जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना संदीप पावसकर म्हणाले, “हा व्यवसाय वाढवताना कुटुंबीय, पत्नी विजया आणि चिरंजीव निहार यांचे सहकार्य लाभले म्हणूनच हे यश मिळाले. मित्र परिवाराची मदत व कामगारांची मेहनत यामुळेच हा टप्पा गाठता आला. ७० हजारांहून अधिक उद्योजकांचा समूह असलेल्या रिसील डॉट इनचा हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. २८ वर्षांचा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम आज फळाला आले,” अशा भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या.