(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दोरीने दरवाजा बांधलेल्या 108 रुग्णवाहिकेचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही जिल्ह्यातील आपत्कालीन सेवेत कोणताही बदल झाला नसल्याचे वास्तव चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी माध्यमांच्या वृत्तानंतरही संबंधित विभागाची हालचाल न दिसल्याने प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही काय आपत्कालीन सेवा? की नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ‘मोबाईल शववाहन’? हा प्रश्नच सध्या उद्भवत आहे.
जिल्ह्यातील अनेक 108 रुग्णवाहिकांची तांत्रिक स्थिती चिंताजनक आहे. तुटलेले दरवाजे, गंजलेले पत्रे, नादुरुस्त ऑक्सिजन सिलिंडर, बंद एसी, निकामी वैद्यकीय उपकरणे अशा स्थितीतच रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन धावत असल्याचे समोर येत आहे. आपत्कालीन सेवेतील ही ढासळलेली अवस्था रुग्णांच्या जीवितावर गंभीर परिणाम करणारी ठरत आहे. दोरीने दरवाजा बांधलेल्या रुग्णवाहिकेची घटना काही दिवसांपूर्वी उघड झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दुरुस्ती, तपासणी किंवा कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. सेवेची जबाबदारी असलेल्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच हे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
108 रुग्णवाहिकांची नियमित तांत्रिक तपासणी अनिवार्य असली तरी प्रत्यक्षात ती केवळ कागदांवरच होत असल्याचे समजते. काही वाहनांची अवस्था एवढी बिकट असूनही ती सेवा देत असल्याने तपासणी व्यवस्थेतील त्रुटी उघड होत आहेत. या गंभीर प्रकरणी आरोग्य विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस भूमिका अद्यापही घेण्यात आलेली नाही. रुग्णांचा जीव तारेवर असो वा दोरीवर, प्रशासनाला काही देणंघेणं नाही का? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. जीव वाचवण्यासाठी धावणारी रुग्णवाहिका दोरीने बांधावी लागते, दरवाजा हाताने सांभाळावा लागतो, उपकरणे निकामी… तरीही संबंधित व्यवस्थापक व आरोग्य विभाग दगडासारखे शांत! हा निष्काळजीपणा नव्हे; तर थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
108 रुग्णवाहिकांची अत्यंत दयनीय अवस्था वारंवार समोर येत असताना संबंधित विभागाची हालचाल अजूनही दिसत नाही, ही गोष्ट चिंताजनकच नाही तर थेट रुग्णांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. दोरीने बांधलेल्या दरवाजाचे फोटो, निकामी उपकरणे, नागरिकांकडून व्यक्त होणारा संताप या सगळ्यानंतरही प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर प्रश्न विचारला जात असताना ही संबंधित विभाग कारवाई का करत नाही? दोरीने दरवाजा बांधलेल्या रुग्णवाहिकेचा प्रकार ‘अत्यंत गंभीर चुकीचे’ उदाहरण असूनही कारवाई होत नसेल, तर पुढील संभाव्य अपघाताची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आणि नेमके कोणाला संरक्षण दिले जात आहे? असे एक नवे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

