(दापोली)
महाराष्ट्र राज्य शासन यांचेवतीने चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शिक्षक, अधिकारी यांच्या कलागुणांना संधी देत क्रीडास्पर्धांचे तालुका ते राज्यस्तरापर्यंत आयोजन केले आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील पालगड बौध्दवाडी शाळेतील शिक्षक रविराज हांगे यांनी तालुका ते विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत खेळत यश संपादन करुन त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आज ८ डिसें.रोजी विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धेचे नियोजन आणि प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान पंचायत समिती दापोली शिक्षण विभागाचेवतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दापोली येथे रविराज हांगे यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी तालुक्यातील तज्ञ शिक्षकांनी उपस्थितांना विविध खेळांबद्दल मार्गदर्शन केले.
रविराज हांगे यांच्या निवडीमुळे दापोलीला अभिमान असल्याचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी गौरव करताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर क्रीडा नोडल अधिकारी.बळीराम राठोड, विस्तार अधिकारी नजीर वलेले, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, केंद्रप्रमुख सुनिल कारखेले आदि उपस्थित होते.

