(दापोली)
दापोली तालुक्यातील खोंडा परिसरात गुरुवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. दापोली–मंडणगड महामार्गावरील जाहिद कॉम्प्लेक्ससमोरील पुलाजवळ घडलेल्या या अपघातात कारचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दापोलीकडून मंडणगडच्या दिशेने वेगात जात असलेली कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाला जोरदार धडकली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की आसपासच्या परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून गेले. झाडाला धडकल्यानंतर वाहन रस्त्याच्या उलट दिशेला वळले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात हर्णे येथील अशरफ मेमन हे चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला तीन टाके पडले असून, सध्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गाडीचा वेग अतिशय जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास सुरू आहे.

