(सावंतवाडी)
तालुक्यातील ओवळीये गावातील जंगलात डुक्कराची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा शिकारी सहकाऱ्याच्याच हातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. डुक्कर असल्याच्या गैरसमजुतीतून गोळी झाडल्याने आणि सचिन सुभाष मर्गज (वय 28, मर्गजवाडी, वेर्ले) हा जागीच ठार झाला.
घटना कशी घडली?
गुरुवारी ओवळीये जंगलात डुक्कर दिसल्याची माहिती मिळाल्याने सचिन मर्गज याने आपल्या मित्रांना शिकार करण्यासाठी बोलावले. शुक्रवार पहाटे सचिन, संशयित शिप्रियान डाॅन्टस (कोलगाव) व आणखी काही सहकारी शिकारीसाठी जंगलात गेले.
शिप्रियानकडे बंदूक होती आणि तो झाडीत नेम धरून बसला होता. इतर काही जणांनी डुक्कर हाकण्यासाठी रान काढणे सुरू केले, त्यात सचिनही होता. यावेळी सचिन वाकून झुडपांतून वाट काढत असताना त्याच्या पावलांचा आवाज शिकाऱ्याला आला. जंगलातील झुडपामध्ये हालचाल झाल्याचं दिसून आल्याने सिप्रियान याने त्या दिशेने गोळी झाडली. यावेळी तेथील काही लांडोर पक्षी उडून बाजूला गेले व त्याचवेळी ‘आई…’ असा मोठा आवाज आला. त्यामुळे सिप्रियान याने त्या ठिकाणी धाव घेतली असता सचिन मर्गजच्या शरीरात गोळी घुसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेला दिसून आला. त्याच्या तोंडावर तसेच छातीत छर्रे घुसले होते. यात अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. डुक्कर समजून शिप्रियानने सचिनवर बंदूक चालवली होती आणि गोळी थेट सचिनच्या छातीत घुसली.
गोळी लागल्यानंतर सहकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या चर्चेनुसार, त्यातील काही जणांनी सचिनचा मृतदेह घटनास्थळी टाकून पळ काढला, आणि गावात ही माहिती पोहोचवली. त्यानंतर सचिनचा मृतदेह सावंतवाडी येथील रुग्णालयात हलवण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणात पोलिसांनी शिप्रियान डाॅन्टस याला ताब्यात घेतले आहे.
सचिनच्या वडिलांनी, सुभाष मर्गज, यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, शिकारीसाठी गेलेले अन्य पाच–सहा जण नेमके कोण होते याबाबत तपास सुरू आहे.

