(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील नारडूवे परिसरात गुरुवारी पहाटे दोन रानगव्यांमध्ये झालेल्या प्राणांतिक झुंजीने जंगल दणाणून गेले. पहाटे सातच्या सुमारास जंगलात मृतावस्थेत पडलेल्या मादी रानगव्याचा शोध लागताच वनविभागात खळबळ उडाली. अधिकारी धाव घेत घटनास्थळी पोहोचले असता झुंजीत खणली गेलीली माती आणि पसरलेले ठसे पाहून संघर्ष किती भीषण असावा याची स्पष्ट कल्पना येत होती.
पाहणीत मादी रानगव्याचा मागील उजवा पाय प्रतिस्पर्धी गव्याच्या शिंगात अडकून फाटल्याचे व ती गंभीररीत्या जखमी झाल्याचे उघड झाले. जिवाच्या आकांतातही सुटता न आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
घटनास्थळीच पशुधन विकास अधिकारी डॉ. कडवई यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून लाकडांच्या साहाय्याने दहन करण्यात आले.
घटनास्थळी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सूरज तेली, सुप्रिया काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने नारडूवे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

