( रत्नागिरी )
तालुक्यातील जयगड परिसरात दोन सेवानिवृत्त शिक्षकांना ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. अज्ञात सायबर गुन्हेगाराने व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेल्या बनावट पीडीएफ व एपीके फाईलच्या माध्यमातून तब्बल ७ लाख ५६ हजार ५१४ रुपये लंपास केले. ही घटना १६ व १७ ऑक्टोबर रोजी घडली असून, तक्रार १८ नोव्हेंबर रोजी जयगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
नासिर अब्दुल्ला बावडे (वय ६१, रा. अकबर मोहल्ला, जयगड) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सेवानिवृत्त शिक्षकांच्या ‘संदखोल केंद्र’ या व्हॉट्सॲप समूहावर एका अज्ञात व्यक्तीने संशयास्पद पीडीएफ आणि एपीके फाईल पाठवली. त्या फाईलवर क्लिक करताच सायबर गुन्हेगारांनी त्यांचे बँक खाते हॅक करून ६,८५,५१४ रुपये काढून घेतले. त्याच पध्दतीने आणखी एका निवृत्त महिला शिक्षिकेच्या खात्यातून ७१ हजार रुपये गायब करण्यात आले. या घटनेनंतर संबंधित शिक्षकांनी धाव घेतल्यावर संपूर्ण प्रकार समोर आला. या फसवणुकीबाबत जयगड पोलिसांनी गुन्हा नोंदवून सायबर तांत्रिक तपास सुरू केला आहे.

