(रत्नागिरी)
रत्नागिरीच्या वर्षा चव्हाण यांना स्वतंत्र कोकणरत्न अभियान तर्फे यंदाची ‘कोकणरत्न’ पदवी जाहीर झाली असून बदलापूर शहराच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एका तडफदार युवा नेतृत्वाचा हा मानाचा गौरव मानला जात आहे. पत्रकारितेची आवड आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत वर्षा चव्हाण यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला स्फुर्ती फाउंडेशन संस्थेतून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने नेतृत्वाची छाप सोडली आहे. सामाजिक कार्यातल्या त्यांच्या योगदानामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला आणि त्याच काळात राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
२०२० मध्ये सामाजिक आवड म्हणून पत्रकारिता आणि संस्थात्मक कामाची सुरुवात केल्यानंतर 2022 मध्ये त्यांनी शिवसेना महिला आघाडी उपशाखामधून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांची काम करण्याची पद्धत, संवादकौशल्य आणि महिलांसाठी केलेली सातत्यपूर्ण धडपड यामुळे अल्पावधीतच त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या. 2023 मध्ये त्यांची शिवसेना उपशहर संघटिका म्हणून निवड झाली. पुढे 2025 मध्ये शिवसेना महिला आघाडीच्या बदलापूर पूर्व संपर्कप्रमुख पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटनेमध्ये तळागाळात जाऊन केलेल्या त्यांच्या सक्रिय कार्यामुळे त्यांची ओळख तडफदार आणि परिणामकारक नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे.
राजकारणासोबतच वर्षा चव्हाण यांचा सामाजिक आणि मानवाधिकार क्षेत्रातील सहभागही उल्लेखनीय आहे. त्या कोकण युवा सेवा संस्थेच्या सदस्य म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ह्यूमन राईट्स संघटनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. माहिती अधिकार पोलिस मित्र सेनामध्येही त्या सक्रिय आहेत, ज्यातून त्यांचा सामाजिक बांधिलकीचा व्यापक दृष्टीकोन अधोरेखित होतो.
त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जनादेश टीव्ही न्यूज निर्भय पत्रकार संघटनेतर्फे 2024 मधील ‘जननायिका’ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. 2025 मध्ये गोव्यात केंद्रिय मंत्र्यांच्या उपस्थितीत वैभव फाउंडेशनच्या ‘भारत निर्माण योगदान अवॉर्ड’ ने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच वर्षी अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनच्या ‘सन्मानमूर्ती’ पुरस्कारानेही त्यांचे नाव सन्मानित झाले. आता ‘कोकणरत्न’ पदवीची भर पडल्याने त्यांच्या सन्मानांची हॅटट्रिक झाली आहे.
13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मुंबईतील आझाद मैदानाजवळील मराठी पत्रकार भवन येथे या मानाच्या पदवीचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. कोकणातील कन्या म्हणून आणि बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात सामाजिक आणि राजकीय कार्याला दिशा देणाऱ्या युवा नेतृत्व म्हणून वर्षा चव्हाण आज नव्या पिढीच्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. पुढील काळात मुंबई आणि कोकणातील महिलांसाठी नवीन संधी, नवीन उपक्रम आणि सशक्ततेच्या दिशेने व्यापक कार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न अधिक वेगाने सुरू आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

