(नवी मुंबई)
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे. वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत.
ही घटना मध्यरात्री 12.40 वाजता घडली. इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागल्यानंतर ती काही क्षणांतच ११व्या आणि १२व्या मजल्यापर्यंत पसरली. रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलासह पनवेल आणि एमआयडीसी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
आग इतकी तीव्र होती की वरच्या मजल्यांवरील अनेक रहिवासी बाहेर पडू शकले नाहीत. दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्ध महिला व्हिलचेअरवर असल्याने खोलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. इतर तिघांचाही होरपळून मृत्यू झाला.
मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44) आणि पुजा राजन (वय 39) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच दहा जखमींवर वाशीतील अपोलो एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्राथमिक तपासानुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेमुळे वाशी परिसरात आणि नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या उत्सवी वातावरणात झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

