(रत्नागिरी)
अंमली पदार्थांच्या विरोधात कोस्टगार्डने बोटींची तपासणी करावी. पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने कारवाई करावी. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधिक्षी बी.बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपअधिक्षक कार्यालयाकडे प्रलंबित असणारे तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेवून, सतर्क राहून कारवाई करावी. विशेषत: सागरी मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करावे. दापोली सारख्या समुद्र किनाऱ्यांवर पोलीसांनी विशेष लक्ष केंद्रीत करावे. कोस्ट गार्डने गस्त घालायला हवी. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन सतर्कतेने सर्व यंत्रणेने तपासणी करावी. कृषी आणि वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी सतर्क रहावे.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे म्हणाले, यादीवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी. अशा गुन्हेगांराची झडती घेतली असेल, पंचनामा केला असेल तर त्याची माहिती द्यावी. कोस्ट गार्डने बोटींची तपासणी करुन कारवाई केली असेल तर त्याविषयीची माहिती द्यावी. पोलीसांनी संशयास्पद टपऱ्यांची तपासणी करावी. एनडीपीएसच्या केसेस मार्गी लावाव्यात. त्याबाबतचे निर्णय लवकर घ्यावेत.
मेडिकल दुकांनांची तपासणी करताना अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबतच पोलीसांनी जावयाचे आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देण्यात येऊ नये. याबाबत अन्न औषध प्रशासनाने मेडिकलला सूचना द्यावी त्याविषयी जनजागृती करावी. तसेच कोणती औषधे द्यावीत वा देऊ नयेत याबाबतची प्रसिध्दी करावी. महाविद्यालय परिसरात टपऱ्यांवर जर अंमली पदार्थांची विक्री होत असेल, तर त्याची माहिती पोलीसांना द्यावी. बंद पडलेल्या कारखान्यांना सातत्याने भेटी देऊन त्याबाबत नियमित तपासणी व्हावी.

