(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाचे देव – घैसास- कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या ७५व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाविद्यालयात संविधान विषयक जागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मुलभूत तत्त्वांची जाणीव करून देणे, अधिकार व कर्तव्यांचे महत्त्व समजावून सांगणे आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री. निखिल आपटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. तसेच भारतीय लोकशाहीची मजबुती, नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व यावर त्यांनी सखोल चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व अधिक व्यापकपणे समजले.
या कार्यक्रमात अनुलोम संस्थेच्या भाग जनसेवक तनया शिवलकर यांनी अनुलोम संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समाजातील वंचित घटकांसाठी अनुलोम संस्था करत असलेल्या कार्याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये संविधानाची माहितीपर चित्रफित दाखवण्यात आली. व विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजुषा सोडवून घेण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रमुख मिथिला वाडेकर, कला शाखा प्रमुख ऋतुजा भोवड, विज्ञान शाखा प्रमुख वैभव घाणेकर, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संविधानाशी संबंधित माहितीपर सादरीकरणांनी कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी पटवर्धन व आभार गौरवी ओळकर हिने केले.

