(मुंबई)
व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी तक्रारदार महिलेवर अरेरावी करताच स्वतःच्या नावाची नेमप्लेट आणि बॅच फेकून मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर राज्य मानवाधिकार आयोगाने तातडीने दखल घेतली आणि संबंधित उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांना १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागवले आहे.
मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त यांनाही नोटीस जारी करून सहा आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी संबंधित फोटोसह तक्रार पाठवली होती, त्यानंतर आयोगाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओसह या प्रकरणाची सखोल शहानिशा सुरू केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडीओमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा आक्रमक वागणूक स्पष्ट दिसून येत आहे.
कोठावदे यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, “पोलिस ठाण्यात महिला तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तिला तक्रार घेण्यास नकार दिला गेला. जाब विचारल्यावर पीएसआय आक्रमक झाली आणि तक्रारदार महिलेला विचारलेल्या नावावरून स्वतःची नेमप्लेट व बॅच फेकून मारली. अशा घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारीवर योग्य ती कारवाई करावी.”

