(कोचीन)
स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक युद्धनौका आयएनएस माहे सोमवारी भारतीय नौदलात दाखल झाली. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली ‘माहे-क्लास’ मालिकेतील ही पहिली नौका असून, भारताच्या समुद्री सुरक्षेत ती महत्त्वाची वाढ करणार आहे. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याची विशेष क्षमता असल्याने ही वेगवान नौका ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचे एक ठळक प्रतीक मानली जात आहे.
कमीशनिंग सोहळ्यात उपस्थित मुख्य अतिथी जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आयएनएस माहेला “स्वदेशी तंत्रज्ञान आणि नौदल क्षमतेचा नवा अध्याय” असे संबोधले. माहे-क्लास मालिकेत एकूण आठ नौका बांधल्या जात असून, त्यातील पहिली नौका सोमवारी ताफ्यात दाखल झाली आहे.
द्विवेदी यांनी सांगितले की, आयएनएस माहे भारतीय डिझाइन, उत्पादन कौशल्य, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, प्रणाली आणि शस्त्रसामग्री यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. नौकेत वापरलेले स्टीलपासून ते नियंत्रण यंत्रणा, सेन्सर्स आणि हल्ला प्रणालीपर्यंत सर्वकाही स्वदेशी आहे.
आयएनएस माहे — मुख्य वैशिष्ट्ये
- लांबी: ७७ मीटर
- वजन: ९०० टन
- कमाल वेग: २५ नॉट (सुमारे ४६ किमी/तास)
- विशेषता: अतिशय कमी आवाज — शत्रूला नौकेचे लोकेशन ओळखणे कठीण बनते
हल्ल्याची क्षमता
- प्रगत सोनार प्रणालीद्वारे पाणबुड्यांचा अचूक शोध
- टॉरपीडो व रॉकेट प्रणालीद्वारे प्रतिहल्ला
- कमी खोलीच्या पाण्यातही दीर्घकाळ ऑपरेशन
- नवीन पिढीचे सेन्सर्स, कम्युनिकेशन नेटवर्क आणि कंट्रोल मशीनरी
भूमिका आणि जबाबदा-या
- किनारपट्टी भागात सतत गस्त
- पाण्याखालील संभाव्य धोके शोधणे आणि नष्ट करणे
- भारताच्या महत्त्वाच्या व्यापारमार्गांचे संरक्षण
- बंदर सुरक्षेत महत्त्वाची भूमिका
- आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठी झेप
यापूर्वी अशा क्षमतेच्या नौका परदेशातून मागवाव्या लागत होत्या. आता त्या पूर्णपणे भारतातच डिझाइन आणि तयार होत असल्याने समुद्री संरक्षणामधील आत्मनिर्भरतेकडे ही महत्त्वपूर्ण पाऊलवाट आहे. पुढील ४–५ वर्षांत उर्वरित सात माहे-क्लास युद्धनौका नौदलात दाखल होणार आहेत.

