[रत्नागिरी/प्रतिनिधी]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २१ नोव्हेंबर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय तापमान कमालीचे चढले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अनेक ठिकाणी थेट आमनेसामने उभ्या ठाकल्या असून, पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट अपक्ष उमेदवारांच्या रूपाने दिसत आहे. हे अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेणार की नाही. यावरच पुढील राजकीय समीकरणांची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
रत्नागिरी, खेड, राजापूर आणि लांजा या तालुक्यांत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून स्पष्ट बंडाची चिन्हे दाखवली आहेत. बुधवारी रत्नागिरीत झालेल्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना कठोर शब्दांत कानउघडणी केल्यानंतर खेडमधील स्थितीत काहीसा बदल जाणवत असला, तरी बाकी तालुक्यांतील अपक्ष उमेदवार आपली भूमिका बदलणार का, याकडे महायुतीचे लक्ष आहे.
दरम्यान, चिपळूणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपमध्ये तसा सलोखा असला, तरी अपेक्षित दोन जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाराज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वय ढासळला असून, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस येथे आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर शुक्रवारचा अर्ज मागे घेण्याचा दिवस जिल्ह्यात मोठ्या बदलांना तोंड फोडणारा ठरणार असून, कोण कोण माघार घेणार आणि कोण जिद्दीने रिंगणात राहणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे खिळले आहेत.

