(रायगड)
पुणे–माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडलेल्या भीषण अपघातात थार कार ५०० फूट खोल दरीत कोसळून चार तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोकणात फिरण्यासाठी गेलेल्या सहा पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी पोलिसांकडे धाव घेतली. मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासल्यावर ताम्हिणी घाट परिसरातच जीपीएस सिग्नल बंद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्था, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली. घाटाच्या अडचणीमुळे शोध कार्य कठीण जात असल्याने ड्रोनची मदत घेण्यात आली.
अखेर आज (गुरुवारी) सकाळी ड्रोन फुटेजमध्ये दरीत चेंदामेंदा झालेली थार आणि चार तरुणांचे मृतदेह दिसून आले. दरी खोल, दगडांनी भरलेली आणि उतार अत्यंत घसरणारा असल्याने मृतदेह वर काढणे बचाव पथकासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितले की, “अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्रथमदर्शनी चालकाचा ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळल्याचे दिसते. आणखी प्रवासी होते का, याचीही तपासणी सुरू आहे.”
विशेष म्हणजे, अपघातग्रस्त थार कार अवघ्या २० दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती. कोकणात फिरण्यासाठी निघालेल्या या सहा तरुणांचा प्रवास अर्ध्यावरच संपला. मृतांमध्ये प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, साहील बोटे, महादेव कोळी, ओंकार कोळी आणि शिवा माने (सर्व पुणे रहिवासी) यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन जणांचा शोध अद्यापही सुरू आहे.

