(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघ, रत्नागिरी तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दिनांक दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या घटनेबाबत महासंघाने राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवून दोषी वकील राकेश किशोर याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महासंघाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर याने सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रकार घडवून आणला. ही घटना केवळ न्यायव्यवस्थेवर हल्ला नसून भारतीय संविधानाचा उघड अवमान असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.
मा. भूषण गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा अंगीकारणारे अनुयायी असून, देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर बसलेल्या अशा व्यक्तीवर हल्ला होणे हे लोकशाही मूल्यांना तडा देणारे आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या अत्यंत सुरक्षायुक्त परिसरात अशी घटना घडल्याने न्यायपालिका आणि न्यायालयीन सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असेही महासंघाने नमूद केले आहे.
या घटनेला लोकशाहीविरोधी, जातीयवादी आणि न्यायसंस्थेचा अपमान करणारी अशी कठोर शब्दांत टीका करत, संबंधित वकीलावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून न्यायालयीन शिस्तीचे पालन होईल याची खात्री करावी, अशी मागणी महासंघाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे. या निवेदनात अध्यक्ष बी. के. कुरतळकर , सरचिटणीस शरद हि. कांबळे, कार्याध्यक्ष जेपी जाधव, उपाध्यक्ष एम. बी. कांबळे, कोशाध्यक्ष सुनील पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

