( रत्नागिरी )
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शांततेला हादरा देणारी आणि नागरिकांच्या अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना काल (सोमवार) सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली. भररस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका हल्लेखोराने कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला.
जखमी तरुणाचे नाव अरमान इनामदार (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे असून, हल्लेखोराचे नाव अंकुश मांडवकर (२९, रा. मांडवी, रत्नागिरी) असे आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अरमान इनामदार रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळ गजबजला परिसर असल्याने काही वेळातच मोठी गर्दी जमली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
प्राथमिक माहितीनुसार, अंकुश मांडवकर हा दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन रस्त्यावर फिरत होता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धमकावत होता. याचवेळी बसस्थानकाकडून मांडवीकडे दुचाकीवरून जात असलेल्या अरमान इनामदार याच्यावर त्याने अचानक हल्ला चढवला. कोणताही विचार न करता त्याच्यावर कोयत्याने एकामागोमाग एक वार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अंकुश मांडवकर याला ताब्यात घेतले. जखमी तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर शहरात भीतीचे सावट पसरले असून, मांडवीसारख्या गजबजलेल्या भागात अशा प्रकारचा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

