(देवळे / प्रकाश चाळके)
राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघाचे कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केवळ आठ दिवसांपूर्वी दाभोळे जिल्हा परिषद गटासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. या सेवेचा उपयोग मेघी गावच्या माजी सरपंचांचे प्राण वाचविण्यासाठी झाला आहे.
दि. ५ नोव्हेंबर रोजी मेघी गावचे माजी सरपंच बबन करंबळे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रात्री सुमारे ९.४५ वाजता देवळे येथील डॉ. मांगलेकर यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीदरम्यान त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉ. मांगलेकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.
तत्परतेने प्रतिसाद देत युवा सेना शाखा प्रमुख समीर आंब्रे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत रुग्णाला अवघ्या ३५ मिनिटांत ४० किलोमीटर अंतर पार करून रत्नागिरीतील ‘चिरायू हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. तातडीने उपचार मिळाल्याने करंबळे यांचा जीव वाचला.
भैय्या सामंत यांच्या पुढाकाराने उपलब्ध झालेल्या या रुग्णवाहिकेमुळे वेळेवर मदत मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. “आमदार साहेबांच्या जनसेवा भावनेमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने आधार मिळाला,” असे देवळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी कोणत्याही पक्षाने अशा प्रकारची सेवा गावस्तरावर उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे भैय्या सामंत यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

