(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
लोटे येथील वारकरी गुरुकुल प्रकरणात दाखल झालेल्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांना खेड न्यायालयाने गुरुवारी (दि. ६) जामीन मंजूर केला. या दोघांविरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारीनंतर १४ ऑक्टोबर रोजी खेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली होती. अटकेनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
गुरुवारी झालेल्या सुनावणीत संशयित भगवान कोकरे महाराज यांच्या वतीने ऍड. मिलिंद जाडकर, तर शिक्षक प्रितेश कदम यांच्या वतीने ऍड. भारत सोनुले यांनी जामिनासाठी युक्तिवाद मांडला. त्यास सरकारी पक्षाने तीव्र विरोध दर्शवून आपल्या बाजूने मुद्दे मांडले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयितांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. या प्रकरणामुळे लोटे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. वारकरी गुरुकुलातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या तक्रारीनंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

