(नवी दिल्ली / श्रीहरिकोटा )
भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण ठरलेल्या स्कायरूट एअरोस्पेसच्या ‘विक्रम-1’ या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे आज (शनिवारी) यशस्वी प्रक्षेपण झाले. या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीच्या तरुण शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे विशेष कौतुक करत ही भारताच्या अंतराळ प्रवासातील नवे पर्व सुरू करणारी घटना असल्याचे म्हटले.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून (SDSC-SHAR) दुपारी १२.०५ वाजता ‘मिशन आगमन’ अंतर्गत विक्रम-1 रॉकेटने यशस्वी झेप घेतली. अंतिम तांत्रिक तपासणीमुळे प्रक्षेपणाला काही मिनिटांचा विलंब झाला होता. मात्र सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रॉकेटने नियोजित उड्डाण करत इतिहास रचला.
या यशामुळे भारत स्वतः विकसित केलेल्या खासगी ऑर्बिटल लॉन्च व्हेईकलचे यशस्वी प्रक्षेपण करणारा अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा देश ठरला आहे. यामुळे भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी नवे दालन खुले झाल्याचे मानले जात आहे.
मोदींकडून तरुण शास्त्रज्ञांचे कौतुक
प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एअरोस्पेसच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी सांगितले की, त्यांनी संपूर्ण प्रक्षेपण थेट पाहिले असून एवढ्या तरुण टीमने मिळवलेले हे यश देशासाठी अभिमानास्पद आहे.
“मी संपूर्ण प्रक्षेपण पाहिले. एवढ्या तरुण टीमने हे यश मिळवले, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन,” असे मोदी म्हणाले.
‘ही तर फक्त सुरुवात आहे’
या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधानांनी स्कायरूटच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, “ही तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात भारताच्या अंतराळ मोहिमा आणखी मोठ्या उंचीवर घेऊन जा,” असे आवाहन केले. तसेच त्यांनी स्कायरूटच्या संपूर्ण टीमला लवकरच भेटण्याचे निमंत्रणही दिले.
‘आत्मनिर्भर भारत’ची ताकद जगासमोर
मोदी म्हणाले की, या यशामुळे भारत अंतराळ तंत्रज्ञानात स्वावलंबी बनत असल्याचे जगाला दिसून आले आहे. खासगी उद्योगांच्या माध्यमातून भारत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत मोठी झेप घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘वंदे मातरम्’चा संदेशही अवकाशात
‘विक्रम-1’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वंदे मातरम्’ संदेशाचे विशेष कार्ड तसेच जगभरातील समर्थकांच्या शुभेच्छाही अवकाशात पाठविण्यात आल्या. या उल्लेखावर मोदी म्हणाले की, “‘वंदे मातरम्’चा संदेश आता अवकाशातही झेपावला आहे.”
2022 नंतरची दुसरी ऐतिहासिक मोहीम
स्कायरूट एअरोस्पेसने २०२२ मध्ये ‘विक्रम-S’ या भारताच्या पहिल्या खासगी सब-ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्यानंतर आता ‘विक्रम-1’च्या माध्यमातून कंपनीने ऑर्बिटल प्रक्षेपणही यशस्वी करून नवा इतिहास घडवला आहे.
‘विक्रम-1’ची वैशिष्ट्ये
- चार टप्प्यांचे (Multi-stage) ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल.
- पहिल्या तीन टप्प्यांत ठोस इंधन (Solid Fuel), चौथ्या टप्प्यात पुनः सुरू करता येणारे लिक्विड इंजिन.
- कार्बन कॉम्पोझिट संरचनेवर आधारित स्वदेशी रॉकेट.
- लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये सुमारे ३५० किलो वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता.
- व्यावसायिक लहान उपग्रह प्रक्षेपणासाठी विशेष डिझाइन.
भारतीय वैज्ञानिकांना अनोखी मानवंदना
भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटला ‘विक्रम-1’ हे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत Grahaa Space, Cosmoserve, DCubed तसेच स्कायरूटच्या SCOPE प्लॅटफॉर्मची तांत्रिक पेलोड्स पाठवण्यात आली. याशिवाय भारतीय वैज्ञानिकांना समर्पित ‘Cosmic Bloom’ ही सूक्ष्म कलाकृती आणि विक्रम-1 तयार करणाऱ्या अभियंते व तंत्रज्ञांच्या स्वाक्षऱ्याही अवकाशात पाठविण्यात आल्या.
ऑर्बिटल रॉकेट म्हणजे काय?
सब-ऑर्बिटल रॉकेट अवकाशात जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत येते, तर ऑर्बिटल रॉकेट उपग्रहाला आवश्यक वेग देऊन पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करते. त्यामुळे उपग्रह दीर्घकाळ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू शकतो. ‘विक्रम-1’च्या यशामुळे भारताच्या खासगी अंतराळ उद्योगाला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली असून भविष्यात व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रात भारतासाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

