(रत्नागिरी)
विषारी घटक असलेल्या ‘कफ सिरप’च्या सेवनाने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विकणाऱ्या कोकण विभागातील तब्बल ९८ औषध विक्रेत्यांवर विभागाने मोठी कारवाई केली असून, १९ लाख ६५ हजार रुपयांचा कफ सिरपचा साठा जप्त करण्यात आला आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विषारी कफ सिरपमुळे बालकांचे मृत्यू झाल्यानंतर एफडीएने राज्यभरात विशेष तपास मोहीम सुरू केली. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील २१३ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९८ विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
जप्त साठ्याची किंमत:
ठाणे : ५९ विक्रेत्यांवर कारवाई – ₹१७.७९ लाख
पालघर : १४ विक्रेते
रायगड : ११ विक्रेते – ₹२०,०००
रत्नागिरी : १० विक्रेते – ₹६१,०००
सिंधुदुर्ग : ४ विक्रेते – ₹१ लाख
एकूण: ९८ विक्रेते, ₹१९.६५ लाखांचा जप्त साठा
या मोहिमेदरम्यान १२५ कफ सिरप नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तथापि, प्रयोगशाळांची मर्यादित उपलब्धता असल्याने अहवालांमध्ये विलंब होत आहे. FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, नमुना अहवाल आल्यानंतर दोषी विक्रेत्यांवर आणि संबंधित औषध उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. रिक्त पदे आणि प्रयोगशाळेच्या अडचणी असूनही FDAने ही तपास मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

