(मुंबई)
बुधवारी रात्री आकाशात वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र दिसला. जगभरातील खगोलप्रेमींनी या ‘सुपरमून’ चा मनमुराद आनंद लुटला. हा या वर्षातील दुसरा सुपरमून असून, यावेळी चंद्र सामान्य पौर्णिमेपेक्षा सुमारे १४ पट मोठा आणि ३० टक्क्यांनी अधिक उजळ दिसला.
खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा चंद्र आणि पृथ्वीतील अंतर सर्वात कमी असते, तेव्हा सुपरमूनची निर्मिती होते. त्यामुळे चंद्र आकाशात नेहमीपेक्षा अधिक जवळ आणि मोठा दिसतो. ५ नोव्हेंबर रोजी चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३,५७,००० किलोमीटर अंतरावर होता, हे सामान्य पौर्णिमेपेक्षा सुमारे २७,००० किलोमीटरने कमी आहे. साधारणपणे चंद्र त्याच्या सर्वाधिक दूरच्या बिंदूवर ४०५,००० किलोमीटर, तर सर्वाधिक जवळच्या बिंदूवर ३,६३,१०४ किलोमीटर अंतरावर असतो.
सुपरमून म्हणजे काय?
‘सुपरमून’ ही एक खगोलीय घटना आहे, ज्यात चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसतो. वर्षभरात साधारण तीन ते चार वेळा सुपरमून पाहायला मिळतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. जेव्हा तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येतो, त्या बिंदूला ‘पेरिजी’ म्हणतात, आणि दूर जातो तेव्हा त्या बिंदूला ‘अपोजी’ म्हणतात. ‘सुपरमून’ हा शब्द प्रथम १९७९ साली ज्योतिषी रिचर्ड नोले यांनी वापरला.
पौर्णिमा आणि सुपरमून यांचा संबंध
चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २७ दिवस लागतात, तर दर २९.५ दिवसांनी एक पौर्णिमा येते. सर्व पौर्णिमा ‘सुपरमून’ नसतात, पण प्रत्येक ‘सुपरमून’ पौर्णिमेलाच येतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना त्याचे अंतर रोज बदलत असल्याने काही पौर्णिमा विशेषतः मोठ्या आणि तेजस्वी दिसतात, यालाच सुपरमून म्हटलं जातं.

