( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करून शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांना नुकसान भरपाई द्या, अशा आशयाचे निवेदन नुकतेच प्रहार दिव्यांग संस्था ठाणे जिल्हाधक्षा तथा कोकण आंदोलन आयोजक प्रहार जनशक्ती पक्ष सौ. काजल परेश नाईक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ सुर्वे, कार्याध्यक्ष आदेश खाडे व महिला जिल्हा अध्यक्षा आरती सुर्वे यांनी दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेती, नाचणी, वरी व इतर अनेक पिकांचे जवळ जवळ 100% नुकसान झाले आहे. तसेच आंबा, काजू यावरील मोहर (फुले) गळून गेल्याने आंबा, काजू उत्पादक यांचे पण नुकसान झाले आहे. तसेच वारंवार येणाऱ्या वादलांमुळे समुद्रात मासेमारी करण्यासाठी मच्छीमार जात नाहीत. त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कारणांनी लवकरात लवकर संबंधित सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांना, बागायतदार व मच्छीमार यांना संकटातून बाहेर काढावे.
तसेच गेले वर्षभर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष झगडत आहे. आंदोलन करत आहे. त्यामध्ये आता अवकाळी पावसाने ओला दुष्काळ आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेली दखल आम्हास त्वरित कळवावी, शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहे. या कारणाने प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित सर्व नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

