(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावर पानवल परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा डंपरखाली पाय आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास घडली.
जखमी तरुणाचे नाव सोनू रामलाल हलवारी (वय ३२, सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) असे असून, तो पानवल येथील रस्त्याने पायी जात असताना मागून आलेल्या डंपरने त्याला धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी स्थानिक पोलिस स्थानकात नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून, अपघाताच्या कारणाचा तपास सुरु आहे.

