(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुसळधार आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील पिकांचे तब्बल ₹187.92 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. केवळ 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यानच 10,082 शेतकऱ्यांच्या 2,213.07 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे.
या कालावधीत सर्वाधिक नुकसान भात पिकाचे 2,102 हेक्टर क्षेत्र, तर नाचणीचे 104.26 हेक्टर, भाजीपाला 4.91 हेक्टर आणि फळपिके 1.09 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. सततचा पाऊस, वादळी वारे आणि परतीच्या पावसाच्या फटक्याने शेतकऱ्यांचे हंगामभराचे परिश्रम अक्षरशः पाण्यात गेले आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पेरणी उशिरा सुरू झाली. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे 55,551 हेक्टर क्षेत्रावर भात व नाचणीची पेरणी करण्यात आली. सप्टेंबर अखेरीस पावसाने थोडा ओघ कमी केला असला तरी, ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह परतीच्या पावसाने जोरदार पुनरागमन केले. या अवकाळी पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतांमध्ये पाणी साचून पिके कुजली, अनेक ठिकाणी शेतमाळांवरील पिके आडवी पडली. परिणामी, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कृषी विभागांनी या नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला असून, आगामी हंगामात परिस्थिती सावरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

