(चिपळूण)
गेल्या महिनाभरात कोकणात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेती आणि नाचणीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अक्षरशः हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावाला स्वतंत्र शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणतर्फे तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनात कोकणातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेती जमीनदोस्त झाली असून भातशेती आणि नाचणीची पिकं पूर्णपणे वाया गेली आहेत. वर्षभराचे कष्ट पाण्यात गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे बळीराम गुजर यांनी म्हटले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव कदम यांनी चिपळूण शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, गोवळकोट, उक्ताड, खंड परिसर आणि मतेवाडी येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, कोकणातील शेतकरी नेहमी मदतीची अपेक्षा ठेवत नाही, पण आता परिस्थिती गंभीर असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी. उपतालुकाप्रमुख नैनेश नारकर यांनी पंचनामे काटेकोरपणे करण्याची मागणी केली, तर सचिन शेट्ये यांनी हे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. महिला पदाधिकारी धनश्री शिंदे व महिला आघाडी क्षेत्र प्रमुख रूमा देवळेकर यांनी पंचनाम्यांची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली.
सचिन चोरगे यांनी सांगितले की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते; आता परतीच्या पावसाने तर शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुके नुकसानग्रस्तांच्या यादीतून वगळल्याचा निषेध नोंदवला. तहसीलदारांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून पंचनामे तातडीने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीर शिंदे, शहरप्रमुख सचिन कदम, युवासेना अधिकारी उमेश खताते, शहर संघटिका वैशाली शिंदे, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, संदीप राणे, उपशहरप्रमुख संतोष पवार, राजू विखारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

