(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुखमधील देवरहाट येथील सप्तलिंगी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. अजय अशोक कांबळे (वय ३५, रा. पूर बौद्धवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना अजयच्या पत्नीसमोरच घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कांबळे हे पत्नीसमवेत सप्तलिंगी नदीपात्रात कपडे धुण्यास गेले होते. त्याचदरम्यान नदीच्या पलिकडे पारोशीची भाजी दिसल्याने ती आणण्यासाठी अजय पाण्यात उतरला. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तो काही क्षणांतच पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला, आणि पाण्यात बुडून गेला. अचानक ही घटना घडताच अजयची पत्नी घाबरून गावात धाव घेत मदतीसाठी गेली. अजयचा भाऊ आशुतोष कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन शोध घेतला, परंतु अजयचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, गावातील संतोष शिवराम कांबळे यांनी आपल्या ओळखीचे गोताखोर रमेश भागुराम सावंत व त्यांच्या पथकाला माहिती दिली. या पथकाने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम राबविली व अजयचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी तपासून अजयला मृत घोषित केले. या घटनेने पूर बौद्धवाडी परिसरात शोककळा पसरली असून, तरुण वयात अजयचा झालेला मृत्यू सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला आहे.

